चांदुरबाजार पोलीस ठाण्यात अभ्यासिकेचा शुभारंभ
विद्यार्थ्यांच्या अध्ययन व ज्ञानसंस्कृती जोपासण्यासाठी वाचनालय व अभ्यासिका उपयुक्त – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती, दि. 1 : ज्ञानसंस्कृती वृद्धिंगत करण्यासह विद्यार्थ्याना अध्ययन साधने व अभ्यासाकरीता हक्काचे सुरक्षित ठिकाण उपलब्ध व्हावे म्हणून अभ्यासिका व वाचनालय आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुध्दा अभ्यास करण्याची जिद्द व चिकाटी असते. चांदूरबाजार येथे पोलीस स्टेशनमध्ये अभ्यासिका सुरू होत आहे. याचा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उपयोग घेऊन आत्मविश्वास व परिश्रमाच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदूरबाजार येथे केले. चांदुरबाजार पोलीस ठाण्याच्या परिसरात सर एपीजे अब्दुल कलाम बहुउद्देशीय सभागृह व वाचन अभ्यासिकेचा शुभारंभ राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. चांदुरबाजारचे नगराध्यक्ष नितीन कोरडे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., तहसीलदार धिरज स्थुल, उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अबदागिरे, पोलीस निरीक्षक सुनील किनगे आदी यावेळी उपस्थित होते. श्री. कडू म्हणाले की, शहरी भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिके सारख्या सुवीधा उपलब्ध असतात. परंतू ग्रामीण भागात सुविधायुक्त वाचनालय, अभ्यासिका आदींची कमतरता असते. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करताना विविध अडचणी येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुध्दा अभ्यास करण्याची जिद्द व चिकाटी असते. स्वयं अध्यनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खूप मुलांनी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन गावांचे नावलौकीक केले आहे. तालुक्यात पोलीस स्टेशनच्या इमारतीत वाचनालय व अभ्यासिकेच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यासाठी मोठी सुविधा झाली आहे. अभ्यास ही एक साधना आहे. या साधनेतून व्यक्तिमत्व विकास होतो. त्यातून आपण एका अर्थाने देश सेवेसाठी तयार होत असतो. भावी पिढीने या संधीचे सोने करून आत्मविश्वास व परिश्रमाच्या बळावर यश प्राप्त करावे, असे आवाहन करुन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पोलीस ठाणे परिसरात अभ्यासिका असल्याने विद्यार्थी सुरक्षित वातावरणात अभ्यास करतील. त्यामुळे त्यांनी एकाग्रतेने अभ्यास करून यश प्राप्त करावे, असे पोलीस अधिक्षक श्री. बालाजी यांनी यावेळी सांगितले. पोलीस निरीक्षक श्री. किनगे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी पोलीस विभागातील कोरोना योध्दांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिंनी व पालकवर्ग, प्रतिष्ठित नागरिक आदी यावेळी उपस्थित होते. पोलीस स्टेशनच्या इमारतमध्ये अभ्यासिकेच्या शुभारंभ प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply