नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पालकमंत्र्यांची चर्चा
जिल्ह्यातील नागरी विकासकामांना निधी उपलब्ध व्हावा
पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी

मनपा प्रशासकीय इमारतीसाठी ३८ कोटी तरतुदीची मागणी

अमरावती, दि. 6 : अमरावती महापालिका व जिल्ह्यातील नागरी विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणीचे निवेदन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

पालकमंत्र्यांनी आज नगरविकास मंत्र्यांना भेटून या मागण्यांबाबत चर्चाही केली. नागरी विकासकामे पूर्ण होण्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी नगरविकास मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. लवकरच ही कामे सुरळीत होतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

विविध लोकप्रतिनिधीनी नागरी विकासकामांबाबत दिलेल्या निवेदनानुसार पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी या मागण्यांचा निवेदन व चर्चेद्वारे पाठपुरावा केला.
आमदार बळवंतराव वानखडे यांच्या निवेदनानुसार नप दर्यापूर अंतर्गत चंद्रभागा नदीवरील अर्धवट पूल पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी नप येथील प्रस्तावित कामांना ठोक तरतुदीअंतर्गत निधीसह मान्यता देणे व सहाय्य योजनेत दोन्ही शहरांना प्रत्येकी पाच कोटी निधी मिळण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.

अमरावती महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी अर्थसंकल्पमध्ये मंजुरी प्रदान करून ३८ कोटी निधी तरतुदीची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेतील लेखाशीर्षअंतर्गत मंजूर कामे बदल, मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रजनन व बालआरोग्य विभागात पदनिर्मिती करून कार्यरत कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अचलपूर शहरात विकासकामांसाठी व सौंदर्यीकरणासाठी ७.७३ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, चिखली येथील हद्दवाढ व एचएसडीपी योजनेत रहिवासी क्षेत्रात परावर्तीत होण्याबाबत, तसेच नगरपंचायत मानोरा येथील विकासकामांना निधीची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Leave a Reply